दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात दोन अल्पवयीन मुलींना इशारा करून छेड काढल्याचा ठपका ठेवत दोन युवकांना नागरिकांनी प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वा. च्या दरम्यान घडली. घटनेनंतर काही काळ शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संबंधित दोन्ही युवकांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरी सुखविंदर सिंग गिल (२२) व हरप्रीत मलखित सिंह (२५, मूळ रा. पंजाब, सध्या रा. कणकवली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. दोघेही कणकवली शहरातील एका सलूनमध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास शहरातील तेलीआळी मार्गावरून दोन अल्पवयीन मुली जात असताना संबंधित युवकांनी त्यांच्याशी अश्लील हावभाव व गैरवर्तन केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. हा प्रकार मुलींनी आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी संबंधित युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, हे युवक त्यांच्या राहत असलेल्या खोलीत असल्याचे समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी तेथे धाव घेत त्यांना पकडले. त्यानंतर काहींनी त्यांना प्रसादही दिला.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन्ही युवकांना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर कणकवली पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही पोलीस ठाण्यात भेट दिली. दरम्यान घटनास्थळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक राकेश राणे, नगरसेविका मेघा गांगण, मनस्वी ठाणेकर, सौरभ पारकर, गौरव हर्णे, औदुंबर राणे, मिथून ठाणेकर, सोनू भंडारी, उमेश आरोलकर, भाऊ आरोलकर, चेतन अंधारी, अमेय पारकर, जावेद शेख, नवू झेमने यांच्यासह तेलीआळी, हर्णेआळी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही युवकांना वैद्यकीय तपासणीसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.













