Breaking News

‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ सायकल यात्रेचा विजयदुर्गहून प्रारंभ

राष्ट्र सेवा दलाचा पर्यावरण बचाव उपक्रम

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवादलाच्या वतीने विजयदुर्ग ते दोडामार्ग अशा 200 किलोमीटर सायकल यात्रेचा शुभारंभ विजयदुर्ग पायथ्याशी प्रभारी सरपंच रियाज काजी तसेच विजयदुर्ग अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाचे प्रणेते तथा इतिहासप्रेमी राजीव परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर येणारे वादळी सावट, पर्यावरणाची हानी पर्यायाने वाढलेल्या उष्णतेचा त्रास यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्र सेवादलाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विजयदुर्ग येथून सुटलेली ही सायकल रॅली पडेल कॅन्टींग, जामसंडे मार्गे जाऊन पहिल्या दिवशी आचरा येथे मुक्काम करणार आहे. या यात्रेच्या शुभारंभाच्या प्रसंगी राष्ट्र सेवादलाचे नितीन वाळके, प्रमोद नलावडे, मधुकर नलावडे, सुहास ठाकूर देसाई, दयानंद मांद्रेकर, इतिहासप्रेमी यशपाल जैतापकर, महेंद्र जावकर, महेश गुरव, ग्रा. पं. सदस्य दिनेश जावकर आणि विजयदुर्ग मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला विजयदुर्ग किल्ल्याच्या पराक्रमाचा इतिहास यशपाल जैतापकर यांनी आपल्या ओजस्वी भाषेत सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. दरम्यान, महेंद्र जावकर यांनीही गोमुख दरवाजाची इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली. आचरा येथे मुक्काम करून दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात मालवण, कुडाळ, मठ, वेंगुर्ले, सावंतवाडी, ओटवणे, बांदा, दोडामार्ग अशी यात्रा जाणार आहे. दोडामार्ग येथे गोवा मुक्ती संग्राम स्मारकापाशी या यात्रेचा समारोप होईल. दरम्यान, विजयदुर्ग येथून सुरू झालेल्या या सायकल यात्रेचे स्वागत अनेक ठिकाणी करण्यात आले. तसेच अनेक गावातील सायकलस्वार या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.