Breaking News

डीटीएसईत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी 7 जूनला ‘इस्रो अंतराळ प्रदर्शन’ निवड परीक्षा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) मार्फत घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ व सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी “इस्रो अंतराळ प्रदर्शन” निवड परीक्षा रविवार, 7 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
लहान वयापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी तसेच त्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेची भीती दूर व्हावी, या उद्देशाने डीटीएसईतर्फे दरवर्षी तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी, प्रमाणपत्र तसेच सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येते. परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देखील दिले जाते.
डीटीएसई परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत बेंगलोर येथील इस्रो अंतराळ प्रदर्शनाला भेट देण्याची विशेष संधी दिली जाते. यासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड परीक्षा 7 जून रोजी घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा बारामती, शिरूर, तुळजापूर, वेळापूर, हडपसर आणि कणकवली अशा सहा केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो अंतराळ प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या डीटीएसई तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत नर्सरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.