Breaking News

झाराप – कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी मगर रेस्क्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ घडली असून रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास संपूर्ण परिसरात मोठी धावपळ उडाली होती. मगरीच्या हालचालींची माहिती मिळताच “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने आणि शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले.

ही मोहीम सावंतवाडीचे ACF वैभव बोराटे तसेच मठ वनपरिक्षेत्र अधिकारी सावळा कामळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पकडलेली मगर पुढील कार्यवाहीसाठी आकेरी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. या धाडसी मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष विष्णू मस्के, डॉ. प्रसाद धुमक, दीपक दुतोडकर, सिद्धेश ठाकूर, प्रसन्ना गंगावणे आणि मंदार गावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच नितीन मांजरेकर, शिरिधर मांजरेकर, केशव होडावडेकर, संतोष पेडणेकर, शुभम पेडणेकर, प्रमोद सावळ आदी ग्रामस्थांनीही महत्त्वाची मदत केली. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष विष्णू मस्के यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “मगर किंवा अन्य वन्यजीव परिसरात आढळल्यास घाबरून न जाता स्वतःहून कोणतीही धोकादायक कृती करू नये. तात्काळ संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक 9545436244 किंवा वनविभागाच्या 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा.” या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची परिसरात मोठी चर्चा सुरू असून, नागरिकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.