“स्नेहभोजनानंतर पत्ते खेळणाऱ्या युवकांवर गुन्हे; ग्रामस्थांचा पोलिसांवर गंभीर आरोप”
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरात कथित जुगार प्रकरणात सात युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित युवक हे दुपारच्या वेळेत स्नेहभोजनासाठी एकत्र आले होते. जेवणानंतर विरंगुळा म्हणून “मेंढीकोट” हा पारंपरिक पत्त्यांचा खेळ सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून त्यांच्यावर जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी कोणताही जुगार अड्डा सुरू नव्हता, तसेच लाखो रुपयांचा जुगार सुरू असल्याचा दावा वास्तवाशी विसंगत असल्याचे सांगितले जात आहे. केवळ मित्रमंडळी एकत्र येऊन मनोरंजन म्हणून पत्ते खेळत असताना युवकांना आरोपी करण्यात आल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या कारवाईत निरपराध युवकांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप होत असून, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या मेंढीकोटला जुगार ठरवून युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.













