Breaking News

आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची बिअर जप्त

४.२१ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त

चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा ते संकेश्वर जाणाऱ्या महामार्गावरील आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीची बिअर वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनासह तब्बल ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.२८ मे २०२६ रोजी रात्री १०:४० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर मारुती चिंतोले (वय २१, मूळ रा. कलंबर बुद्रुक, ता. लोहा, जि. नांदेड, सध्या रा. रांजणगाव, एशियन चौक, ता. शिरोळ, जि. पुणे) हा मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट कार क्रमांक MH-12-JC-5640 मधून गोवा बनावटीची १५ बॉक्स बिअर बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आला.

विशेष म्हणजे, आरोपीकडे वाहन चालविण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे मद्य वाहतुकीसह विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत बिअरचा साठा व वाहन असा एकूण ४,२१,३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आंबोली परिसरातून गोवा बनावटीच्या मद्याची होत असलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधिक सतर्क झाल्याचे या कारवाईतून दिसून आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, रामदास जाधव, गौरव परब तसेच होमगार्ड आनंद बरागडे, चंद्रकांत जंगले आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी संयुक्तरीत्या केली.