Breaking News

देवगडमध्ये अवैध गांजा लागवडीवर पोलिसांचा छापा; 49 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोटकामते आडीवरेवाडीत कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध गांजा लागवड उघडकीस आणली. कोटकामते येथील आडीवरेवाडीत एका घराच्या परिसरात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहीकर यांनी अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. गोपनीय सूत्रांकडून कोटकामते आडीवरेवाडी येथील रहिवासी ओंकार राजाराम कोतेकर (वय 30) याने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला.

कारवाईदरम्यान दोन शासकीय पंच, कृषी अधिकारी, फोटोग्राफर, वजनकाटा धारक तसेच फॉरेन्सिक पथक यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी सुमारे 2 किलो 450 ग्रॅम वजनाची, 3 ते 5 फूट उंचीची, ताजी व ओलसर अवस्थेतील 23 गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 49 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 65/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 8(क) व 20 (ब) (2) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये गांजाची लागवड केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम बुवा करीत आहेत.