कणकवली शहर सुशोभीकरणासाठी नगरपंचायतचे नियोजन | फुलं, फळे, भाजी विक्रेत्यांसाठी विविध पर्यायांची चाचपणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून विविध उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. उड्डाणपूलाखालील परिसराचे सुशोभीकरण, वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी आणि अतिक्रमण हटविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कणकवली शहराला स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीच्या दृष्टीने सुसूत्र बनविण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक ते मंजुनाथ हॉटेल परिसरापर्यंत उड्डाणपूलाखाली मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उपक्रम सुरू असून त्याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या परिसरात शिस्त लावण्यासाठी विविध पर्यायांवर नगरपंचायत विचार करत आहे. यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचीही तयारी प्रशासनाने केली आहे. शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबतही नगरपंचायत सकारात्मक असून वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने दूर करण्यात येणार आहेत. कणकवली शहरातील सुमारे १२ ते १४ प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे , असे संदेश पारकर यांनी सांगितले.













