Breaking News

सामाजिक बांधिलकी जपत संत निरंकारी फाउंडेशनची कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकार्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने ४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, सेवादल, अधिकारी, कार्यकर्ते व साथसंगत यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्रमदानाच्या माध्यमातून रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना “जिथे स्वच्छता असते, तिथे निरोगी जीवन नांदते” हा संदेश दिला. संत निरंकारी मंडळाच्या वतीने नांदगाव, वारगाव, फोंडा तसेच जिल्हाभर विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हे अभियान आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी उपस्थित राहून परिसर स्वच्छतेसाठी योगदान दिले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत असून, स्वच्छता अभियान हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम असल्याची माहिती सहयोजक विलास जाधव यांनी दिली.

या प्रसंगी सहयोजक विलास जाधव, संचालक महेश पांचाळ, नागेश आमडोसकर, पुरुषोत्तम कदम, सेवादलाचे सदस्य, कार्यकर्ते, साथसंगत तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सचिन डोंगरे उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेला सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळाला.