Breaking News

भिरवंडे वनपरिमंडळात पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम; वृक्षारोपणाने दिला संवर्धनाचा संदेश

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनक्षेत्र कणकवली अंतर्गत वनपरिमंडळ भिरवंडे येथील नियतक्षेत्र कुंभवडेमधील श्री महालिंगेश्वर देवालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसराची साफसफाई करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कुंभवडे येथे जैवविविधता संवर्धन व संगोपन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास कुंभवडे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, वनपाल भिरवंडे श्रीम. कुसुम कांबळे, वनपाल दिगवळे सदाशिव वागरे , वनरक्षक भिरवंडे सिद्धार्थ शिंदे, वनरक्षक कुंभवडे श्री. प्रभू काळे, तसेच वनक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण व जनजागृतीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.