कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने असलदे शिवाजीनगर परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १९ हजार २०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक बीट अंमलदार यांचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून २०२६ रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे नांदगाव ते देवगड मार्गावरील असलदे शिवाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक माने (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरोपी अवधूत शामसुंदर वाळके (वय ४६, रा. असलदे शिवाजीनगर, ता. कणकवली) व महेश मारुती मोरये (वय ३५, रा. नांदगाव वाशीनवाडी, ता. कणकवली) यांच्या विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी ७ हजार २०० रुपये किमतीच्या Oaksmith कंपनीच्या १८० मिलीच्या ४८ सीलबंद बाटल्या तसेच १२ हजार रुपये किमतीच्या BOB’s Lemon Vodka या गोवा बनावटीच्या १८० मिलीच्या १२० सीलबंद बाटल्या असा एकूण १९,२०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
तपासात आरोपी क्रमांक २ याने गोवा बनावटीची दारू आरोपी क्रमांक १ याला आणून दिली असून आरोपी क्रमांक १ हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने सदर मद्यसाठा बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.













