Breaking News

अंकुश जाधव यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा आदर्श समाजसेवक अंकुश विष्णू जाधव (मु. पो. झरेबांबर, ता. दोडामार्ग) यांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे अंकुश जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार १४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सोलापूर येथील निर्मिती लॉन्स, नडगिरी पेट्रोल पंपासमोर, जुळे सोलापूर, विजापूर रोड येथे होणार आहे. समाजात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या अंकुश जाधव यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.