Breaking News

श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा

स्वामी पादुका पालखी १२ जूनला अक्कलकोटकडे करणार प्रस्थान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पवित्र स्वामी पादुका पालखी १२ जून रोजी पुण्यभूमी अक्कलकोटकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी होणार असून, अक्कलकोट येथे पालखीचे भव्य व शाही स्वागत करण्यात येणार आहे. १३ जून रोजी अक्कलकोट येथे श्री खंडोबा मंदिर, गुरुमंदिर, वटवृक्ष मंदिर आणि समाधी मंदिर या पवित्र स्थळांच्या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावर स्वामी पादुका पालखीची प्रदक्षिणा परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १४० हून अधिक स्वामी भक्त सहभागी होणार असून, इतर शहरांतील भाविकही या भक्तिमय यात्रेत सामील होणार आहेत.

परिक्रमा सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे देवगड-मुटाट येथील श्री रामेश्वर ढोलपथकाचे पारंपरिक ढोल-नृत्य सादरीकरण. टाळ, मृदुंग आणि स्वामी नामाच्या अखंड गजरात भाविक भक्तिरसात तल्लीन होणार आहेत. श्रद्धास्थानतर्फे वटवृक्ष मंदिर आणि समाधीस्थळ येथे विशेष भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थान, खंडोबा मंदिर, गुरुमंदिर आणि समाधी मठ प्रशासनाकडून खोटले येथून आलेल्या स्वामी पादुका पालखीचे भव्य स्वागत करण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

१४ जून रोजी पहाटे समाधी मंदिरात स्वामी पादुकांवर लघुरुद्र पूजा व अभिषेक करण्यात येणार असून, त्यानंतर श्रद्धास्थान उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी श्रद्धास्थानाच्या वतीने स्वामी भक्तांसाठी विशेष संकल्प घोषणाही करण्यात येणार आहे. या संपूर्ण यात्रेमुळे स्वामी भक्तांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले असून, १४ जून रोजी स्वामी पादुका पालखी पुन्हा श्री क्षेत्र खोटलेकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती मठाधिपती श्री गणेश घाडीगावकर यांनी दिली. “भक्ती, नामस्मरण आणि स्वामी चरणी अखंड श्रद्धेचा संगम अनुभवण्यासाठी अक्कलकोट परिक्रमा सोहळा भक्तांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.”