अंगात ‘देव येतो’ सांगणाऱ्याला मिळाला धडा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोडः चूक मान्य करत दिला माफीनामा

कट्टा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पराड गावातील एका वाडीत आपल्या अंगात देव येती असा दावा करत लोकांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला संबंधीत व्यक्तीने आपली चूक मान्य करत समितीसमोर लेखी माफीनामा दिला आहे. बसल्या बसल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या अंगात देवाचा संचार झाल्याचे भासवून संबंधित व्यक्ती लोकांचे मेळे सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत भरवून पैसे घेत असल्याचे समोर आले. यामुळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला आहे.

याची शहानिशा करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी आपल्या सोबत महिला संघटिका उज्वला येळावीकर, युवा संघटक युगांत चव्हाण, सहसंघटक सहदेव पाटकर आणि कार्यकर्ते योगेश वराडकर यांना घेऊन त्यांच्या घरी गेले. दिवसभर थांबून हा भोंदू बाबा कसे मेळे घेतो ? लोकांना काय-काय उपाय सांगतो? ते उपाय करण्यासाठी किती खर्च सांगतो? स्वतः करणी काढण्याची मजूरी किती सांगतो हे सर्व रेकॉर्डिंग केले असता वरीलप्रमाणे त्याचे दावे रेकॉर्ड झाले, खोटं नाणे करण्यासाठी भारतीय चलनातील नाणी हातोड्याने ठोकून खोटी करण्याचे सल्लेही दिले. हा गुन्हा कॉईन अॅक्ट २०११ नुसार गुन्हा ठरतो. या भोंदू बाबाने स्वतःमध्ये अलौकिक शक्ती असून मला देव प्रसन्न असून तो देव सर्व प्रश्नांची उत्तरे देतो उपायही सांगतो असा आभास भक्तांमध्ये निर्माण केला आणि ‘कुडी” फक्त ते सांगितलेले उपाय करते. उपाय न केल्यास जिवितास धोका असल्याचे सांगून भाविकांना ते उपाय बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी ‘तोड करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून रोख रक्कम घेत होता.

अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक विजय चौकेकर यांनी झाडाझडती घेताच माझ्यात कोणताही दैवी संचार होत नाही. एक वेळ मला सुधारण्याची संधी द्यावी पुन्हा मी अंगात कोणताही देव आणून लोकांना फसविणार, असा लेखी माफीनामा दिला आहे.

कोणत्याही भोंदू बाबांच्या, अंगात संचार येणाऱ्यांच्या नादी लागून फसवणूक करून घेऊ नये., असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर आणि अध्यक्ष अॅड. राजीव बिले यांनी केले आहे.