देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी २५ वर्षीय अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह २१ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवणे येथील समुद्रकिनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तेथील शैलेश लवू चौगुले यांनी गावचे पोलीस पाटील समृद्धी समीर परकर यांना फोनद्वारे दिली. ही माहिती पोलीस पाटील यांच्यामार्फत देवगड पोलीस स्थानकाला मिळाल्यानंतर देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, हवालदार आशिष कदम यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सदर महिलेचे वय सुमारे २५ वर्षे असून उंची साडेचार फूट आहे. तसेच तिचे केस बांधलेल्या अवस्थेत होते. अंगात गुलाबी रंगाचा पूर्ण हाताचा टॉप व निळसर रंगाची जीन्स पॅण्ट होती. पायात जांभळ्या पांढऱ्या रंगाचे बूट होते. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील समृद्धी परकर (३३, रा. पडवणे) यांनी दिली आहे, अशी माहिती देवगड पोलिसांनी दिली. दरम्यान, सदर अनोळखी मृत महिलेबाबत कोणतीही माहिती असल्यास देवगड पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड पोलिसांनी केले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.












