नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) : देशातील महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तेलंगणासह अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील एक अनुभवी आणि वजनदार राजकारणी मानले जातात. त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या वर्मा यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून 2018 ते 2023 या काळात अर्थ आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. राजकारणासोबतच त्यांना साहित्य आणि कलेची प्रचंड आवड असून ते एक लेखक आणि कवी म्हणूनही परिचित आहेत. महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असेल.












