उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था; बेशिस्त वाहनांवर कडक कारवाईचा इशारा
शहरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी नगरपंचायतीचे पूर्ण सहकार्य मिळणार नगराध्यक्ष संदेश पारकर
कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत अनेक निर्णायक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनियमित वाहन पार्किंग, सर्व्हिस रस्त्यांवरील अतिक्रमण तसेच बंद अवस्थेतील सीसीटीव्ही यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत होत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. बस स्थानक ते गांगो मंदिर, गांगो मंदिर ते नरडवे तिठा, पटवर्धन चौक ते पोलीस ठाणे तसेच नरडवे तिठा ते रेल्वे स्टेशन या प्रमुख मार्गावर वाहनांची अनियंत्रित पार्किंग होत असल्याने नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखालील जागेत तात्पुरत्या स्वरूपात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी वाहतूक पोलिसांना तातडीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच सर्व्हिस रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणारी वाहन पार्किंग व रस्त्यावरच वाहने उभी करून विक्री करणाऱ्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने अशा प्रकारांवर पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
बस स्थानक परिसरात विशेषतः बस मार्गस्थ होताना बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने या भागात कडक नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची गंभीर बाब समोर आल्याने ते तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
दरम्यान, मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी पोस्ट कार्यालय परिसर, भालचंद्र महाराज मठ रस्ता, तेली आळी या भागांत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, त्या दिवशी वाहन पार्किंगची तात्पुरती व्यवस्था क्रीडांगणाजवळ करण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
नगरपंचायतीच्या स्तरावर आवश्यक त्या सर्व ठिकाणी पूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त
केला. या उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीस उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, तसेच अमोल आघम, रविंद्र म्हाडेश्वर उपस्थित होते. याशिवाय नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, लुकेश कांबळी आणि सत्यजित पारकर उपस्थित होते.












