कुडाळ (प्रतिनिधी) : हळदिचे नेरुर येथील रांजणवाडी चर्मकार समाज बांधवांनी दीर्घकाळ चालत आलेल्या अन्यायाविरोधात एकजूट दाखवत अखेर गावातील श्री ग्रामदेवता जटाशंकर मंदिर, गणपती मंदिर व सातेरी मंदिर येथे प्रवेश मिळवून सामाजिक समतेचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
वर्षानुवर्षे मागासवर्गीय असल्याच्या कारणावरून मंदिर प्रवेश नाकारला जात असल्याने समाजात नाराजीचे वातावरण होते. ही अन्यायकारक परंपरा थांबवण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येत ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांकडे दाद मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या आंदोलनासाठी चर्मकार समाज संघटना व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापक पाठिंबा उभारण्यात आला. महेश नारकर, भरत नेरकर, भाई नेरकर, श्रावण नेरकर, अशोक नेरकर, राजन नेरकर, रवींद्र नेरकर, निळकंठ चव्हाण, गणपत नेरकर, कैलास नेरकर, सचिन चव्हाण, अक्षय चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेत समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणले.
३० मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात मंदिर मानकरी व समाज बांधवांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मानकरी अनुपस्थित राहिल्याने निर्णय होऊ शकला नाही. या बैठकीत सिंधुदुर्ग चर्मकार समाज उन्नती मंडळाचे राजन वालावलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अमित चव्हाण व पत्रकार जाधव यांनी कायदेशीर मुद्दे मांडले.
यानंतर ३१ मार्च रोजी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे व कुडाळ पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी ४ एप्रिल रोजी गावात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
ठरल्याप्रमाणे ४ एप्रिल रोजी तहसीलदार, पोलीस अधिकारी व संबंधित यंत्रणा गावात दाखल झाली. सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत चर्मकार समाज बांधवांना मंदिर प्रवेश देण्यात आला.
या प्रक्रियेत संतोष चव्हाण, अमित चव्हाण, पत्रकार संदीप चव्हाण, तसेच सुजित जाधव, संजय (छोटू) कदम, बीडीओ विजय चव्हाण, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, परशुराम चव्हाण, उदय शिरोडकर, मधुकर चव्हाण, के. टी. चव्हाण, चंद्रसेन पाताडे, गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण, रामदास चव्हाण, श्रीराम चव्हाण, मनोहर सरमळकर आदींचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
दीर्घकाळ चालत आलेल्या भेदभावाला अखेर पूर्णविराम मिळाल्याने समाज बांधवांत समाधानाचे वातावरण असून, हा निर्णय सामाजिक ऐक्य व न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.












