नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या कंपनी व्यवस्थापनाला सूचना
सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) मार्फत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामाचा आढावा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतला. हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य रीतीने पूर्ण करावे आणि यादरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा कडक सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील सर्वोदयनगर, गणेश नगर आणि शिरोडा नाका या भागात सध्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षांनी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांच्यासोबत नगरपरिषदेचे अधिकारी आणि संबंधित कंपनीचे कंत्राटदार उपस्थित होते.
नागरी सुविधांकडे विशेष लक्ष पाहणी दरम्यान नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, गॅस पाईपलाईनचे काम करताना रस्ते किंवा इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, पावसाळा तोंडावर असल्याने शहरातील गटारे आणि नाल्यांची सफाई तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचे संकेत शिरोडा नाका परिसरात पाहणी करत असताना, तेथील अनधिकृत फळविक्रेत्यांची त्यांनी दखल घेतली. अधिकृत परवाना असल्याशिवाय कोणालाही रस्त्यावर फळविक्री करता येणार नाही, अशा सूचना देत त्यांनी नियमांचे पालन करण्याचे बजावले.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, अभियंता आकाश शिंदे, संदेश पाटील, सुरज पाटील यांच्यासह नगरपालिकेचे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व विकासकामे आणि दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी दिसून आले.












