वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी सदस्य पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार दि ७ एप्रिल ते सोमवार १३ एप्रिल या कालावधीत एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मठ, चिपी, परुळेबाजार व मेढा या ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठी ही पोटनिवडणूक मंगळवार दी २८ एप्रिल रोजी होणार आहे. मठ प्रभाग क्रमांक २ (महिला) मधून कविता आशिष घोलेकर, पुनम नरेश बोवलेकर, तर प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण स्त्री) मधून सुप्रिया सुशांत गावडे व दर्शना दिनेश नाईक यांनी अर्ज दाखल केले आहेत.
परुळेबाजार प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण स्त्री) मधून रश्मी वासुदेव सामंत व अपेक्षा अंकुश दादगे, चिपी प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण) मधून संदेश चंद्रकांत करंगुटकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मेढा प्रभाग क्रमांक २ (सर्वसाधारण) जागा बिनविरोध राहण्याची शक्यता आहे.
नामनिर्देशन अर्ज छाननी बुधवार दी १५ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि १७ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. आवश्यकतेनुसार मतदान दि २८ एप्रिल रोजी होऊन मतमोजणी दी २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.












