सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या एप्रिलच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी, २४ रोजी सायंकाळी ५.३० वा. ‘रंग-संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाटक आणि प्रेक्षक यांचे नाते उलगडणाऱ्या या कार्यक्रमात नाट्यकर्मी, निवेदक नीलेश पवार हे रसिकांशी संवाद साधणार आहेत.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग ‘प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग चौदावा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, व्यवस्थापन, बॅकस्टेज, तालमी असे रंगभूमीचे अनेक आयाम आहेत. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, अभिनेते व प्रेक्षक यांचे नाते, नाटक या सशक्त माध्यमांची ताकद, नाटक कसे पाहवे, याबाबत युवा अभिनेते, लेखक, निवेदक नीलेश पवार संवाद साधणार आहेत. क्रिकेटपटू असलेले नीलेश पवार डबिंग आर्टिस्ट, समालोचक, व्हायोलीन वादकही आहेत. दूरचित्रवाणी मालिका, नाटके, एकांकिकांतून त्यांनी भूमिका केल्या. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहवे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.












