मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेतर्फे २४ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना नळयोजनेचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात येणार आहे. सर्व नळधारकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मालवण पालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेमार्फत शहर व शहराबाहेरील भागात दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, सध्या धामापूर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून, धामापूर पंपिंग स्टेशनला वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे पाणी उपसा आणि साठवण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. पंपिंग स्टेशनला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने तसेच विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.












