संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल
कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींवरून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जोरदार टीका करत खडे सवाल उपस्थित केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल वसुलीचा घाट घालणे म्हणजे सिंधुदुर्गवासीयांवर अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पारकर म्हणाले, प्राधिकरण दडपशाही किंवा पोलीस बळाचा वापर करून टोल सुरू करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारला जाईल. टोलच्या नावाखाली जिल्हावासीयांची आर्थिक लूट सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ओसरगाव येथे टोलनाका सुरू झाल्यास जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना, विशेषतः शासकीय कामासाठी ओरोस येथे वारंवार ये-जा करणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे ही जागा टोलसाठी अयोग्य असल्याचे पारकर यांनी नमूद केले. जर टोल लावायचाच असेल, तर तो जिल्ह्याच्या सीमेवर असावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी गोवा राज्याचे उदाहरण देत सांगितले की, अनेक राष्ट्रीय महामार्ग असूनही तेथे टोल नाही. तसेच कोल्हापूरमध्ये नागरिकांनी एकजूट दाखवून टोलविरोधात आंदोलन करून प्रयत्न हाणून पाडले होते. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातही यापूर्वी जनतेच्या एकजुटीमुळे टोल सुरू होऊ दिला नव्हता, याची आठवण त्यांनी करून दिली.
टोलविरोधात जिल्ह्यात पुन्हा एकदा एकजूट होण्याचे आवाहन करत, सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून “सिंधुदुर्ग टोलमुक्त” अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पारकर यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात टोलनाका कशासाठी, आणि कोणाच्या फायद्यासाठी सुरू केला जात आहे, असा सवाल उपस्थित करत, प्राधिकरणाने टोल लादण्याचा निर्णय घेतल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही पारकर यांनी दिला. जिल्हावासीयांच्या टोलमुक्तीच्या भूमिकेकडे राज्यकर्त्यांनी संवेदनशीलतेने पाहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.












