उन्हाच्या तडाख्यात जनगणना प्रशिक्षण; शिक्षकांचा संताप उसळला, वेळ बदलाची जोरदार मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यभर सुरू असलेल्या जनगणना प्रशिक्षण प्रक्रियेला कोकणातील वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांवर शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपुऱ्या सोयीसुविधा आणि विस्कळीत वेळापत्रकामुळे शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रशिक्षणाची वेळ बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रशिक्षणाची वेळ आणि सुविधा यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये सकाळी ९:३० वाजता प्रशिक्षण सुरू झाले, मात्र सभागृहात पंख्यांचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने शिक्षकांना अक्षरशः घामाघूम व्हावे लागले. यामुळे संतप्त शिक्षकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
याउलट मालवण येथे एसी हॉलची सुविधा उपलब्ध असल्याने प्रशिक्षण सुरळीत पार पडत आहे, तर वेंगुर्ले येथे तक्रारीनंतर प्रशासनाने एसी हॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र देवगडमध्ये सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:००, तर वैभववाडी आणि वेंगुर्ले येथे सकाळी ९:३० ते ५:३० अशा वेगवेगळ्या वेळांमुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
जिल्हा स्तरावरून आवश्यक सोयीसुविधांचे निर्देश देण्यात आले असले, तरी तालुका स्तरावर नियोजनाच्या अभावामुळे शिक्षकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. सावंतवाडीत तर उष्णतेमुळे प्रशिक्षणार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर प्रशिक्षण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
दरम्यान, शिक्षक प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशिक्षणाची वेळ बदलण्याची मागणी केली आहे. “सध्याच्या तीव्र उन्हात सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:०० ही वेळ अत्यंत त्रासदायक आहे. प्रशिक्षण सकाळी ८:०० ते दुपारी १:०० या वेळेत घेण्यात यावे, जेणेकरून दुपारच्या कडक उन्हाचा त्रास टाळता येईल,” अशी मागणी पुढे येत आहे.
शिक्षकांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या देखील मांडल्या आहेत. सर्व प्रशिक्षण केंद्रांवर एसी किंवा पुरेशा पंख्यांची व्यवस्था करावी, सर्व तालुक्यांमध्ये एकसमान वेळ निश्चित करावी आणि प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घेण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी या प्रश्नावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.