सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १९ वर्षे प्रलंबित असताना, अपुऱ्या सुविधा आणि धोकादायक प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. “महामार्गाचे काम पूर्ण न करता आणि नागरिकांना मूलभूत सुविधा न देता टोल वसुली करण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रशासनाने जबरदस्तीने टोल सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे हा टोलनाका बंद पाडेल,” असा थेट इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईवर संताप व्यक्त करताना केसरकर म्हणाले की, अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. काही ठिकाणी रस्ता खचलेला असून, तर काही भागात काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामांमुळे यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
याशिवाय, महामार्गालगत आवश्यक असणारे सर्व्हिस रोडच अनेक ठिकाणी अस्तित्वात नाहीत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन मुख्य महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर टोलचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे अन्यायकारक आहे. जोपर्यंत सर्व्हिस रोडची व्यवस्था होत नाही, स्थानिक वाहनधारकांबाबत ठोस धोरण जाहीर होत नाही आणि प्रलंबित महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा ठाम इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, या गंभीर विषयावर सत्ताधारी मात्र गप्प बसल्याचा आरोप करत मनसेने त्यांच्यावरही टीका केली आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“रस्ता नाही, सुविधा नाही… मग टोल कशासाठी?” करत मनसेने प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. असा सवाल












