सावंतवाडीत लॉजिंगमध्ये ७० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. नोवेल अल्बर्ट डिसोजा (रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) असे मृत वृद्धाचे नाव असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोवेल डिसोजा हे गेल्या चार दिवसांपासून सावंतवाडी येथील साईकृपा लॉजिंगमध्ये मुक्कासाला होते. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील सर्विसबॉय रूमच्या सफाईसाठी गेला असता, डिसोजा यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निदान झाले आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हवालदार सुरेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.