बुद्ध लेणी संवर्धक अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर यांना तेजस सेवा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : पुरळ, ता. देवगड जि. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले व प्राचीन बुद्ध लेणी संवर्धन चळवळीचे अभ्यासक प्रफुल्ल विश्वनाथ पुरळकर यांना संगमनेर जिल्हा नगर येथील तेजस सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर झाला असून त्यांच्या पुरस्कार निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तेजस प्रतिष्ठान या शासनमान्य संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर येथे भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल “संविधान अमृत महोत्सव” साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने बौद्ध समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग व्यापार व धार्मिक चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व योगदान देणाऱ्या एकूण ७५ व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार वितरण सोहळा आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.४ जून २०२६ रोजी स.१०.०० वा. मालपाणी लॉन्स, पंचवटी हॉल शेजारी संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

प्रफुल्ल पुरळकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांनी आज पर्यंत महाराष्ट्र तसेच राज्य बाहेरील एकूण १०९ प्राचीन बौद्ध लेणी स्तूप यांना भेटी दिल्या असून याचा संग्रह करून तो प्रसिद्ध देखील केला आहे. प्राचीन बौद्ध लेणी अभ्यासक म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळख असून बौद्ध लेणी व्यक्तिरिक्त जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्यापैकी ६ किल्ल्याचा अभ्यास दौरा प्रफुल्ल पूरळकर व त्यांच्या टीमने केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार -२०२६ जाहीर झाला आहे.