Breaking News

कर्ली नदीकाठी असलेले बेकायदेशीर वाळू रॅम्प उद्ध्वस्त !

कुडाळ महसूलची कारवाई

चोरटे वाळू उत्खनन करणा-या माफीयांना दणका

कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कर्ली नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने मोठी कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या थेट आदेशानंतर तहसीलदार सचिन पाटील यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या मोहिमेमुळे संपूर्ण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने कर्ली नदीतील वाळू लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, त्यामुळे नदीतून वाळू काढण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही काही ठिकाणी बोटींच्या साहाय्याने चोरून वाळू उपसा केला जात होता. हा बेकायदेशीर उपसा आणि त्याची वाहतूक सोयीची व्हावी यासाठी नदीकिनारी ठिकठिकाणी अनधिकृत रॅम्प तयार करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत महसूल विभागाने आज सायंकाळी उशिरा जेसीबीच्या साहाय्याने हे सर्व रॅम्प जमीनदोस्त केले. या धडक मोहिमेत तहसीलदार सचिन पाटील यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी, विविध गावचे ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस पाटील यांचा ताफा सहभागी होता. प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे नदीपात्रातून होणाऱ्या वाळू चोरीला चाप बसणार असून, यापुढेही अवैध उपशावर अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.