तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात दिव्यांगांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग (प्रतिनिधी) : दिव्यांग विभागात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निर्णयाविरोधात रायगड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बदलीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामकाजात मोठे आणि सकारात्मक बदल केले होते. त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
मागील अनेक वर्षे मर्यादित स्वरूपात असलेले दिव्यांग विभागाचे कामकाज त्यांनी अधिक व्यापक केले. खोट्या दाखल्यांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. तसेच, दिव्यांगांना शासकीय लाभ मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत यासाठी ऑनलाइन प्रणाली आणि अॅपची सुविधा सुरू करण्यात आली. २४ तासांत तक्रारींचे निवारण होईल अशी यंत्रणा उभी करण्यात आली.
रोजगारासाठी टूल किट योजना, दिव्यांग-अव्यंग विवाह योजना अशा विविध योजनांचा लाभ घरबसल्या मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे दिव्यांगांच्या पुनर्वसनाला गती मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने दिव्यांगांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर, तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी रायगड जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीने केली आहे. साईनाथ पवार आणि बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.