समस्या मांडली… समाधान मिळाले; कृतज्ञतेने पालकमंत्री नितेश राणेंची भावनिक भेट

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे वेळेत निराकरण झाल्यानंतर व्यक्त होणारी कृतज्ञता ही लोकप्रतिनिधींसाठी मोठा सन्मान असतो. असा हृदयस्पर्शी अनुभव शनिवारी झालेल्या नागरिक संवाद कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला.

आरोग्य विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून थकीत राहिलेला पगार हा गंभीर प्रश्न मागील संवाद कार्यक्रमात समोर आला होता. ठेकेदार कंपनीकडून वेतन वेळेवर न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावला.

आपला प्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी युगंधर तेंडोलकर, गौरेश केळुसकर, रोशनाली परब, श्रमिका मस्के, वैभवी चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी खास सिंधुदुर्ग नगरीत येऊन पालकमंत्र्यांची भेट घेतली. संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी कृतज्ञतेने आभार मानले.
या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद, डोळ्यांतील समाधान आणि मनापासून व्यक्त झालेली भावना उपस्थितांनाही भावूक करून गेली. नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास यामुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नातं अधिक दृढ होत असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.