वैभववाडी (प्रतिनिधी) : दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी उंबर्डे येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा वैभववाडी यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. जुवाटकर (मांगवली) हे होते. शिबिराच्या पहिल्या सत्रात केंद्रिय शिक्षक आदरणीय जनीकुमार कांबळे यांनी “कार्यकर्ता कसा असावा?”, त्याची आदर्श आचारसंहिता तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या २४ प्रकारच्या शिबिरांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात “दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” तसेच भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी रचना, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा केंद्रिय शिक्षक आदरणीय आनंद कासार्डेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच येत्या १७ मे २०२६ रोजी होणाऱ्या धम्म परिषदेसंदर्भातही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली. आयु. श्रीपत कांबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. विनोद कदम कुंभवडेकर यांनी केले. यावेळी आयु. सदानंद कदम (कोषाध्यक्ष), संदीप जाधव, रविंद्र जंगम (बौद्धाचार्य), किरण भोसले, सुरेश भोसले, प्रकाश जाधव, महेंद्र कदम, संजय कांबळे, रमेश कांबळे (तरेळे शाखा सरचिटणीस), नाधावडेकर ताई आदींसह बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सामुदायिक सरणेत्ये घेऊन सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.













