सुमारे ७ हजारांची रोकड लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरीमध्ये चोरट्यांनी एकूण ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली असून भर बाजारपेठेत झालेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी नगरपरिषदेच्या खाली असलेल्या या संकुलातील ६ दुकानांचे लॉक चोरट्यांनी तोडले. यापैकी एका दुकानातील ५ हजार रुपये आणि एका बेकरीतील २ हजार रुपये अशी एकूण ७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. उर्वरित चार दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तिथे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पीएसआय सरदार पाटील, हवालदार शिंगाडे, शिंदे, धोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तातडीने श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. सध्या उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.












