कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर अपशब्दात पोस्ट केल्याप्रकरणी कणकवलीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाणे गाठले.
अभी आचरेकर नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबुक अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरत पोस्ट केल्याने वातावरण तापले. याबाबत संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्याकडे तक्रार देत संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट वारंवार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी अभी आचरेकर याला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणले असल्याची माहिती मिळाली.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत, अण्णा खाडये, लक्ष्मण गावडे, अॅड. प्रसाद सावंत, कळसुली सरपंच सचिन पारधीये, पप्पू पुजारे, शिशिर परुळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.












