खारेपाटण ग्रामपंचायतीचा पंचायत राज अभियानात सक्रीय सहभाग

गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ गाव निर्मल गाव व हरित गाव करण्याचा संकल्प

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६” मध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला. या अभियानाच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ गाव निर्मल गाव व हरित गाव करण्याचा संकल्प खारेपाटण ग्रामस्थानी व्यक्त केला असल्याचे खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर यांनी सांगितले.

खारेपाटण गावच्या माजी सरपंच व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर तसेच उपसरपंच महेंद्र गुरव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात चांगले काम करत खारेपाटण गाव पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले असून त्याच्या या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल असा विश्वास खारेपाटण ग्रामस्थानी व्यक्त केला आहे.

या अभियानाद्वारे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीना सक्षम करणे हा शासनाचा उद्देश असून याबरोबरच लोकांचा ग्रामपंचायती मध्ये सहभाग वाढविणे व गावाचे पारदर्शी प्रशासन चालवून सदर ग्रामपंचायती आत्मनमिर्भर बनविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून नुकतीच खारेपाटण या ग्रामपंचायतीची पाहणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शासन नियुक्त टीमद्वारे करण्यात आली असून खारेपाटण ग्रामपंचायतीसह संपूर्ण खारेपाटण गावांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यावेळी या टीमचे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी स्वागत करून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती या टीमला दिली. एकंदरीत खारेपाटण ग्रामपंचायतीच्या कामाबाबत संबंधित टीमने समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना विविध ऑनलाइन दाखले मिळवून दिले, बचत गटातील महिलाना विविध प्रशिक्षणे देऊन त्यांना सक्षम बनविले.

गावातील शाळांची रंगरंगोटी करून शाळांचे सुशोभीकरण करण्यास मदत केली. जलशुद्धीकरण करून नागरिकांना स्वच्छ पाणी दिले, सौर पॅनलच्या माध्यमातून वीज बचतीचा संदेश दिला. तर गावात एकूण ४० महिला बचत गट असून त्यातील सुमारे ३५० महिलाना व्यवसायाच्या मध्यातून लखपती करण्यासाठी मदत केली. याबरोबरच १५ वित्त आयोगातून ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले. बचत गटातील महिलांच्या उत्पादन मालाला बाजारपेठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य विषयी विविध शिबिरे घेऊन लोकांना सेवा दिली आहे.

गावचा शाश्वत विकास करण्यासाठी शासन ग्रामपंचायतीना बक्षीस रूपाने जी रक्कम अनुदान म्हणून देणार आहे. त्याचा उपयोग ग्रामपंचायतीने आपल्या गावचा विकास करण्यासाठी करणे गरजेचे आहे.

श्री विशाल वरवडेकर, ग्राम विकास

अधिकारी, खारेपाटण