तिलारी खोऱ्यात हत्तीं विरोधात शेतकऱ्यांच एल्गार

आधी लोकप्रतिनिधींची भेट, नंतर आंदोलन ; केर येथे १३ सदस्यीय संघर्ष समितीची स्थापना

दोडामार्ग (प्रतिनिधी) : काजू हंगामात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणाऱ्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी आता निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. केर येथे बुधवारी ग्रामस्थ व वनविभागाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रथम लोकप्रतिनिधींना भेटून व्यथा मांडण्याचा, त्यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी १३ सदस्यीय संघर्ष समिती स्थापन करण्याचेही ठरविण्यात आले असून लवकरच इतर बाधित गावांतील सदस्यांचा समावेश करून समितीचा विस्तार केला जाणार आहे.

सुरुवातीला लोकप्रतिनिधींची भेट

आंदोलन करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना भेटण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन तिलारी खोऱ्यातील हत्ती प्रश्न जिल्हाव्यापी स्वरूपात मांडला जाणार आहे. “खासदार श्री. राणे यांची वेळ आपण घेऊ,” अशी माहिती शिवसेना नेते राजेंद्र निंबाळकर यांनी बैठकीत दिली.

ठोस निर्णयाशिवाय बैठक नको

ग्रामस्थांनी २०१८ पासून हत्तींच्या त्रासाबाबत वनविभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. मात्र दरवर्षी त्याच तक्रारी आणि त्याच स्वरूपाची उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “यापुढे ग्रामस्थांना भेटायचे असल्यास ठोस निर्णय घेणारे अधिकारीच बैठकीला यावेत,” अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

काजू हंगामात मोठा फटका

तिलारी खोऱ्यात काजू हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. दरवर्षी हंगामाच्या काळात हत्तींच्या कळपांकडून बागायतींची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नुकसानभरपाईच्या बाबतीतही वनविभागाकडून ठोस तरतूद नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. “काजू नुकसानीची तरतूद नाही,” असे सांगून जबाबदारी झटकली जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

धोरणात्मक निर्णयासाठी संघर्ष

केर येथील बैठकीत हत्ती प्रश्न केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी सुटणार नाही, तर शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय आवश्यक असल्याचे ठाम मत व्यक्त झाले. त्यामुळे तिलारी खोऱ्यातील सर्व बाधित गावांना एकत्र करून व्यापक लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. बैठकीस शिवसेना नेते राजेंद्र निंबाळकर, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस, केर उपसरपंच तेजस देसाई यांच्यासह तुकाराम देसाई, रत्नकांत देसाई, हर्षद देसाई, विष्णू देसाई, शिवराम देसाई, सगुण नाईक, शंकर देसाई, मंगेश देसाई, राघोबा देसाई, नारायण देसाई, महेंद्र देसाई, प्रकाश देसाई, अनंत देसाई, पोलीस पाटील सर्वेश देसाई आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा हा एल्गार आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार असून, शासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.