वेंगुर्ल्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक

९ लाख ९० हजाराचा गंडा; कणकवलीतील दोन महिलांवर गुन्हा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले-भटवाडी येथील एका व्यावसायिकाची कणकवलीतील दोन महिलांकडून गेमिंग अप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून ९ लाख ९० हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकरणी सोमवारी कणकवली येथील दोन महिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

२४ फेबुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता ते २६ फेबुवारी रोजी १२.३० वाजण्याच्या कालावधीत वेंगुर्ले शहरातील एका हॉटेलमध्ये वेंगुर्ले भटवाडी येथील २५ वर्षीय व्यवसायिकांस कणकवली-वाडीवरवडे येथील ३० ते ३५ वयोगटातील दोन महिलांनी www.stake.com या गेमिंग अप्लिकेशनबाबत माहिती देऊन पैसे गुंतवल्यास त्याचा जास्त फायदा होईल, असे आमिष दाखविले. सदर युवकाचा विश्वास संपादन करून त्यांनी अॅपसाठी YES बँक शाखा डोंबिवली ईस्ट येथील आपल्या खात्यावर ९ लाख ९० हजार रुपये रक्कम RTGS द्वारे भरण्यास सांगितले.

या संदर्भात फसवणूक झालेल्या युवकाने वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही महिलांवर बीएनएस कलम ३१८ (४), ३ (५.) आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर अधिक तपास करीत आहेत.