मालवण (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र, उत्तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “हवामान बदल व त्याचे जनसामान्यांच्या जीवनावरील परिणाम” या विषयावर तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण येथे करण्यात आले.
या परिषदेत धुळे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील युवकांनी सहभाग घेत स्थानिक पर्यावरणीय प्रश्न व पर्यावरणीय न्याय या विषयांवर सखोल चर्चा केली. युवा साथी दूलरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मुद्द्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोकणातील शाश्वत शेती व जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी प्रसाद गावडे यांच्या ‘जीवनशाळा’ तसेच बाळू परब यांच्या ‘मांगर इको ऍग्रो टुरिझम’ प्रकल्पांना भेट देण्यात आली. जीवनशाळेत युवकांनी श्रमदानही केले. प्रसाद गावडे यांनी कोकणातील निसर्गावर आधारित साधी जीवनशैली विशद करताना विनाशकारी विकास प्रकल्पांऐवजी स्थानिक गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यावर भर दिला.
युवकांनी कोकणातील मच्छीमारांच्या समस्यांची माहिती घेतली तसेच स्वामिनी महिला बचत गटामार्फत चालविण्यात येणाऱ्या बोटींग क्लबचा अभ्यास केला. कांदळगाव येथे भेट देऊन कांदळवनांचे पर्यावरण संरक्षण व सागरी परिसंस्थेमधील महत्त्व इकोमेट साथी दूर्गा, स्वाती पारकर यांचे मार्गदर्शनात समजून घेतले.
समारोप सत्रात बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शन करत संस्थेची माहिती दिली व युवकांना पर्यावरणीय प्रश्नांवर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. युथ बीट्स फॉर क्लायमेटच्या मेगल डिसोझा यांनी मनोगत व्यक्त करत परिषदेमुळे युवकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगितले.
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या परिषदेतून युवकांनी पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना व कृती आराखडा घेऊन जाण्याचा संकल्प केला.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी विभागीय समन्वयक दिपक देवरे, अनुभव साथी सहदेव पाटकर, अशोक वरूटे, जितेंद्र राठोड, महादेव कोटे, युवा साथी दूलरी, प्रदीप राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.













