तिलारी खोऱ्यातून ‘ओंकार’ हत्तीची सासोलीकडे पुन्हा वाटचाल

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार’ हत्ती ऐन काजू हंगामात पुन्हा एकदा सासोली परिसरात दाखल झाला असून, काजू गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायंकाळच्या सुमारास सासोली येथील जंगलात शेतकरी काजू गोळा करत असताना हा हत्ती त्यांच्या नजरेस पडला. ऐन हंगामातच हत्ती दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी दिली.

दरम्यान, वन विभागाची टीम हत्तीच्या मागावर असून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी विशेषतः काजू गोळा करताना जंगल भागात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. हत्तीच्या उपस्थितीमुळे काजू हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.