देवगड (प्रतिनिधी) : देवगड शहरा किरकोळ करणावरून धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत उशीरापर्यंत पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती जखमीवर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्रम अश्रफ होलसेकर (42) असे जखमी तरुणाचे नाव असून ही घटना सोमवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली संशयिताने तेथून पालायन केले असले तरी एकमेकांना परिचित आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार, देवगड आठवडा बाजाराच्या रस्त्यावर असलेल्या एका दुकानानजिक अक्रम व संशयिताचे किरकोळ कारणावरुन वाद झाले. तेथिल काही ग्रामस्थांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला परंतू संशयिताला राग अनावर झाल्याने त्याने आपल्याकडील कोणत्यातरी धारदार हत्याराने अक्रम याच्यावर हल्ला चढविला.
या हल्ल्यात अक्रम याच्या उजव्या गालावर खोलवर जखम झाली. हल्ला करुन संशयितांने तात्काळ घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर घटनास्थळावरील ग्रामस्थांनी तात्काळ अक्रम याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवगड पोलिस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी अक्रम याची विचारपूस करुन घटनेची माहिती जाणून घेतली.
या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच राजकीय व्यक्तीसह स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात दाखल झाली नव्हती. दरम्यान अक्रम याच्या उजव्या गालावरील जखम ही 15 सेंमी लांब असून 2 सेंमी खोल आहे. तरीही त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगीतले.












