असलदे येथे ‘आरोग्य शिबिर’चे आयोजन; नागरिकांसाठी मोफत तपासण्यांची संधी

असलदे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत असलदे यांच्या वतीने तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या सहकार्याने पंधरा वित्त आयोगांतर्गत एकदिवसीय ‘आरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत असलदे येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पार पडणार आहे.

या आरोग्य शिबिरात ग्रामपंचायत असलदे कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये नेत्र तपासणी, रक्त तपासणी, जनरल तपासणी, एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार औषध पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटपही करण्यात येणार आहे.

रक्त तपासणीमध्ये CBC, HB, TFT (थायरॉईड), PCR, HCV आणि लिपिड प्रोफाइल टेस्ट अशा विविध चाचण्या केल्या जाणार आहेत. या शिबिरासाठी डॉ. चंद्रकांत पुरवकर (जनरल फिजिशियन), डॉ. दिपाली पाळयेकर (स्त्रीरोग तज्ञ) आणि डॉ. मारुती सावंत (नेत्रचिकित्सक) हे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडे सुरू असलेल्या औषधांची माहिती किंवा डॉक्टरांनी दिलेले कागदपत्र सोबत आणावेत. तसेच आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत असलदे आणि संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन असलदे ग्रामपंचायत तसेच सरपंच चंद्रकांत डामरे आणि संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.