हातखंबा टोलच्या जाहिरातीवरून लगावला सणसणीत टोला !
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा निलेश राणे यांनी स्वतः केलेल्या आंदोलनांचे काय झाले, याचा आधी शांतपणे विचार करावा असा खोचक सल्ला नाईक यांनी यावेळी दिला.
वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्या आंदोलनांमधील विसंगतीवर बोट ठेवताना हातखंबा टोल नाक्याचे उदाहरण दिले. २०२३ मध्ये जेव्हा हातखंबाचा टोल सुरू झाला होता, तेव्हा राणे यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची भाषा केली होती. मात्र, ज्या ठेकेदाराला त्या टोलचे काम मिळाले, त्याच ठेकेदाराने निलेश राणे यांच्या वाढदिवसाला वर्तमानपत्रांतून जाहिराती दिल्या, असा खळबळजनक दावा नाईक यांनी केला. “हे सत्य सर्वांना ठाऊक आहे आणि जर त्यांना आठवत नसेल तर मी त्या जाहिरातींचे फोटो त्यांना पाठवेन,” असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना आणि आपल्या आंदोलनांची भूमिका स्पष्ट करताना नाईक म्हणाले की, आमची सर्व आंदोलने ही काजू-आंबा बागायतदार, एलईडी मासेमारी आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नांसाठी म्हणजे सर्वसामान्यांच्या हितासाठी असतात. आमच्यावर राजकीय सूडबुद्धीतून कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही डगमगणार नाही. जे चुकीचे आहे त्याविरोधात जनतेला सोबत घेऊन आमची लढाई अखंड सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिरोडकर हत्या प्रकरणाचा संदर्भ देत, आपल्या आंदोलनामुळेच गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खावी लागली आणि काही सहकारी तडीपार झाले, याची आठवण करून दिली.
सर्वात मोठा प्रहार त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री
रवींद्र चव्हाण यांच्या प्रकरणावरून केला. निवडणुकीच्या काळात निलेश राणे यांनी चव्हाण यांच्यावर केलेली जहरी टीका आणि निवडणूक संपताच पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्यासमोर टेकलेले हात संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, असे नाईक म्हणाले. कालच्या रवींद्र चव्हाण प्रकरणावरून तुमच्या आंदोलनात आणि विरोधात काहीच धमक उरली नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वैभव नाईक परिणामांची भीती न बाळगता जनतेसाठी रस्त्यावर उतरत राहील, असे ठणकावून सांगत त्यांनी राणेंनी स्वतःच्या राजकीय विश्वासार्हतेचा विचार करावा, असे आवाहन केले.












