वैभववाडी (प्रतिनिधी) : मागील सभेत सूचना करूनही याही सभेला खाते प्रमुख उपस्थित राहत नसतील, तर आम्ही तरी सभेला कशासाठी उपस्थित राहायचे? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी उपस्थित केला.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात उपसभापती साची कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पाटील, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, साधना नकाशे, देवानंद पालांडे आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच मागील सूचनांचे वाचन करताना याही सभेला काही प्रमुख विभागांचे खाते प्रमुख गैरहजर असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचायत समितीचे अधिकारी वगळता इतर विभागांचे अधिकारी वारंवार गैरहजर राहतात. मागील सभेत गैरहजर राहिलेल्या संबंधित खाते प्रमुखांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतरही ते अनुपस्थित असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला.
“अधिकारी सभेला उपस्थित राहत नसतील, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात कसे सुटणार?” असा प्रश्न उपस्थित करत अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोके यांनी केली. याच मुद्द्यावर बोलताना सुवर्णा संसारे म्हणाल्या की, सभापती उपस्थित राहू शकत नसतील तर पत्र देतात, मग अधिकारी तसे पत्र का देत नाहीत?
उपसभापती साची कोलते यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळ पाळतात का, असा सवाल उपस्थित केला. यावर गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांनी कार्यालयीन वेळ न पाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येतील, असे सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून अपघात घडत आहेत. याबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बोलावून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी देवानंद पालांडे यांनी केली.
वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व तयारी म्हणून वीजवाहिन्यांची दुरुस्ती व झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करावी, जेणेकरून पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी सूचना सदस्यांनी केली.
तालुका ग्रामीण भागात असला तरी येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याची गरज असून प्राथमिक शाळांमध्येही नियोजनबद्ध शिक्षण दिल्यास पालकांचा कल पुन्हा शाळांकडे वळेल, असे मत देवानंद पालांडे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी एसटी बस हे मुख्य वाहतूक साधन असताना बस सेवा अनियमित असल्याने मौदे, जांभवडे, कुर्ली या भागातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी बस वेळेत सोडाव्यात, अशी मागणी पालांडे व लोके यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांना बसमधून उतरवणाऱ्या चालक-वाहकांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चालक-वाहकांना विद्यार्थ्यांना मार्गातच बसमध्ये घेण्याच्या सूचना दिल्या असून, पुढे अशी घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
शाळा व अंगणवाड्यांचे वीज बिल व्यावसायिक दराने येत असल्याची बाब निदर्शनास आणून देत ते घरगुती अथवा शासकीय दराने आकारावे, अशी सूचना उपसभापती कोलते यांनी केली. यावर वीज वितरणचे उपअभियंता चव्हाण यांनी, शासकीय कार्यालयांचे वीज बिल स्वतंत्र दराने आकारले जाते. जर कुठे व्यावसायिक दर लागू केला जात असेल, तर ती बाब निदर्शनास आणून द्यावी, असे सांगितले.
यावेळी देवानंद पालांडे यांनी काही कर्मचारी साचेबंद उत्तरे देऊन नागरिकांची दिशाभूल करतात, अशी टीका केली. तसेच कोणत्याही शाळेचे वीज बिल थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडू नये, अशी सूचना सदस्यांनी केली.













