कर्नल विजय सावंत यांचे कनेडी विद्यालयात इंग्रजी व्याकरण मार्गदर्शन

कनेडी (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान इंग्रजी व्याकरण विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात भिरवंडे गावचे सुपुत्र तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले निवृत्त कर्नल विजय भालचंद्र सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कर्नल सावंत यांचे माध्यमिक शिक्षण कुर्ला (मुंबई) येथे तर उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे झाले. शिक्षणादरम्यान त्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए), खडकवासला येथे निवड झाली. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि ऑगस्ट १९६४ मध्ये सैन्यात भरती झाले. सैन्यात तोफखाना विरोधी कोरमध्ये त्यांनी सेवा बजावली. सेवाकाळात त्यांनी मद्रास विद्यापीठातून ‘एम.एससी. इन डिफेन्स स्टडी’ तसेच पुणे विद्यापीठातून ‘डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरही त्यांची शिकण्याची व शिकवण्याची आवड कायम असून विविध महाविद्यालये व माध्यमिक शाळांमध्ये ते इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करत आहेत. या तीन दिवसीय कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान देत इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे हितचिंतक दत्ताराम सावंत यांनी आभार मानले.