हळवल रेल्वे फाटकाजवळ भरधाव डंपरने रिक्षाला दिली धोकादायक हुलकावणी

संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनंतर चालकावर कारवाई

न्यायालयाकडून १० हजारांचा दंड

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रेल्वे फाटकाजवळ भरधाव वेगाने रिक्षाला धोकादायक पद्धतीने हुलकावणी देणाऱ्या डंपर चालकावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली असून, न्यायालयाने त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंजुनाथ दौडमनी (वय ४२, मूळ रा. विजापूर) असे दंडित करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

रविवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रिक्षाला अचानक हुलकावणी दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. क्रशरवरील डंपर वारंवार भरधाव वेगाने धावत असल्याने या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करून डंपर अडवून ठेवले होते. काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व ग्रामस्थांची समजूत काढली.

यानंतर संबंधित डंपर चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.