कणकवली (प्रतिनिधी) : दी स्पाईन फाऊंडेशन, मुंबई, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ७मार्च रोजी सकाळी ९ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या मणक्याचे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णांच्या मणक्याची मोफत तपासणी झाल्यानंतर ज्या रुग्णांना मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात येईल. त्यांची मोफत शस्त्रक्रिया २७ व २८ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे करण्यात येणार आहेत.
दी स्पाईन फाऊंडेशन ही महाराष्ट्रातील नामवंत स्पाईन सर्जरी करणारी संस्था आहे. निष्णात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची गेली ३० वर्षे वाटचाल सुरू आहे. दी स्पाईन फाऊंडेशनमध्ये जवळपास ५० अनुभवी स्पाईन सर्जन आहेत. स्पाईन फाऊंडेशनची स्थापना १९९८ साली असून सध्या भारतभर त्यांची ३० सेवा केंद्र कार्यरत आहेत. मणक्याच्या आजारासाठी मोफत सेवा देणारी ही संस्था भारतातील एकमेव संस्था असून भारतातील अतिदुर्गम व आदिवासी पाड्यात कार्य करत आहे. मणक्याचे उपचार हे खर्चिक असल्यामुळे सामान्य रुग्णांना ते परवडत नाहीत. म्हणून ही देशव्यापी चळवळ सुरू केलेली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व सौराष्ट्र ते आसाम अशा संपूर्ण भारतभर आपल्या वेगवेगळ्या सेवा केंद्रांमार्फत सेवा देत आहेत. डॉ. शेखर भोजराज यांनी असे स्पष्ट केले आहे की, ही चळवळ व्यक्तीकेंद्रीत नसून ‘गरज तेथे सेवा’ या ध्येयाने प्रेरीत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. प्रणित प्रकाश पावसकर (MS ORTHO SPINE SURGEON), कणकवली यांच्याजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या शिबिरांची जबाबदारी आहे. डॉ. प्रणित प्रकाश पावसकर यांनी ग्रैंड मेडिकल येथे रँए पूर्ण करून स्वस्थियोग प्रतिष्ठान, मिरज येथे MS ORTHO पूर्ण केलेले आहे. सध्या ते शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्पाईनमध्ये फेलोशिप करत आहेत.
यापूर्वी दी स्पाईन फाऊंडेशन, मुंबई, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी अशाच प्रकारचे शिबीर आयोजित केलेले होते. त्या शिबिरामध्ये २१० रुग्णांची तपासणी करून १५ रुग्णांना मणक्याच्या सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार १९ व २० डिसेंबर रोजी ११ रुग्णांवर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत सर्जरी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे २ रुग्णांवर एकाचवेळी मानेच्या व कंबरेच्या मणक्याच्या सर्जरी करण्यात आल्या होत्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन दी स्पाईन फाऊंडेशनमार्फत डॉ. प्रणित पावसकर, मोबा. ९४२२५८०७४९ व डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेटे, रोशन कुळे यांनी केले आहे.












