सिंधुदुर्गनगरीत ११ मार्चला पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ११ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष लवू म्हाडेश्वर व सचिव दत्तप्रसाद वालावलकर यांनी संयुक्तरित्या केले आहे.

विजेत्या संघास ७,७७७ रुपये, उपविजेत्या संघाला इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कृत ५,५५५ रुपये अशी रोख बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच पूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला ज्येष्ठ पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या नावाने आकर्षक चषक देण्यात येणार आहे. मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांनाही आकर्षक चषक देण्यात येणार आहे. आठ तालुका, एक मुख्यालय पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असे एकूण दहा क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी लवकर सुरू करण्यात येणार असून दुपारच्या सत्रात विश्रांती घेऊन सायंकाळच्या सत्रात उर्वरित सामने होणार आहेत.