कणकवली (प्रतिनिधी) : वागदे आर्यादुर्गा नगर परिसरात शुक्रवारी पहाटे एक गवारेडा शिरल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. हा गवा रेडा शुक्रवारी पहाटे ६.२४ वाजता आर्यादुर्गा मंदिराच्या पुढ्यातून नमसवाडी मार्गावरून धावत गेला. त्या मागून काही वेळातच पहाटे येणारी बस या मार्गावरून गेली. मात्र स्थानिकांना हा गवा दिसून आला नाहीं. आर्यादुर्गा नगर परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून गवा रेडा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्यात गवा रेड्यानी नुकसान केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.












