शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर कणकवलीत 18 एप्रिल रोजी कॅण्डल मार्च व आदरांजली सभा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : येथील शिक्षणसेवक दि. प्रशांत गंगाराम तांबे तसेच राज्यातील मृत शिक्षणसेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिक्षणसेवक कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार, दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता कणकवली येथे कॅण्डल मार्च व आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षणसेवक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शिक्षणसेवकांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांवर आज समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत स्व. प्रशांत तांबे यांच्या दुर्दैवी निधनाचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांचा मृत्यू ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून शिक्षणसेवक व्यवस्थेतील त्रुटी व शासनाच्या असंवेदनशीलतेचे ज्वलंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तांबे सरांनी य मोठ्या संघर्षातून शिक्षकाची नोकरी मिळवली होती. गेली दोन वर्षे ते केवळ ₹15,799 इतक्या अल्प मानधनावर शिक्षणसेवक म्हणून कार्यरत होते. शिक्षणसेवक कालावधी पूर्ण होण्यास अवघे एक वर्ष बाकी असताना, दि. 4 एप्रिल रोजी त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबाची अत्यंत बिकट अवस्था असून, शासकीय सेवेत असूनही कोणतीही मदत मिळालेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणसेवकांच्या मृत्यूची ही चौथी घटना असूनही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्यांसाठी हा कॅण्डल मार्च आयोजित करण्यात येत आहे. या सभेस स्व. तांबे यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती राहणार आहे.