सामाजिक बांधिलकीकडून गरजू बालकास मदतीचा हात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : समाजाप्रती आपले कर्तव्य आणि संवेदनशीलताजपत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ पुन्हा एकदा एका गरजू बालकाच्या मदतीसाठी धावून आले आहे. एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला ९ वर्षीय कु. तन्मय दळवी याच्या शस्त्रक्रियेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द करण्यात आला.

तन्मय दळवी याच्यावर मुंबईतील परेल येथील नामांकित वाडिया हॉस्पिटलमध्ये २७ तारखेला महत्त्वाची शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च दळवी कुटुंबासाठी मोठा असताना, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने मदतीचा पुढाकार घेतला. यावेळी गांधी चौक येथील ‘श्री गणेश स्टोअर्स’चे व्यापारी जयप्रकाश बांदेकर यांनीही तन्मयच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, श्री. बांदेकर यांनी यापूर्वी संस्थेच्या रुग्णवाहिकेसाठीही मोलाचे सहकार्य केले आहे. याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे म्हणाले की, “समाजात वावरताना सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर अनेक दुर्मिळ आजार असलेल्या मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांचे प्राण वाचवण्याचे भाग्य आमच्या प्रत्येक सदस्याला लाभले आहे, याचे मोठे समाधान वाटते.” या सेवाकार्यात प्रतिष्ठानच्या सक्रिय सदस्या रूपा मुद्राळे यांच्या विशेष योगदानाचे आणि परिश्रमांचे प्रा. बागवे यांनी कौतुक केले. मदत मिळाल्यानंतर दळवी कुटुंबीयांनी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी तन्मय दळवी व त्याचे आई-वडील, प्रा. सतीश बागवे, भास्कर साधले, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, रवी जाधव आदी उपस्थित होते.