गाळाच्या नावाखाली बेकायदेशीर उत्खनन

कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात माडखोल ते बांदा या पट्ट्यात गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू, दगड आणि मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ एप्रिल २०२६ रोजी नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा संजय विठ्ठल राणे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशांचा गैरफायदा घेत काही स्थानिक अधिकारी आणि गोव्यातील व्यापाऱ्यांच्या संगनमताने वाळू व दगडांची तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांगेली, माडखोल, ओटवणे, इन्सुली, सातोळी, बावकट, रोंळे आणि बांदा या भागांत नदीकिनारी वाळू-दगडांचे मोठे साठे करून ठेवण्यात येत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रात्री-अपरात्री आणि पहाटेच्या सुमारास या मालाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले असून, नदीपात्रातून काढलेला गाळ गावांमध्ये साठवण्याऐवजी वाळू-दगडांचा साठा करून विक्री केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास १५ एप्रिल रोजी माडखोल-मांगेली नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई ते सावंतवाडी प्रवासादरम्यान किंवा आंदोलनावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.